सार्वजनिक बांधकाम विभाग करणार कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत कल्याण राज्यमार्ग 76 वर रस्त्याच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या बांधकामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिल्या आहेत. अतिक्रमणे हटवण्याची मोहीम बांधकाम खाते हाती घेणार असून, डोणे फाटा ते नेरळ मिनी ट्रेन ट्रॅक या दरम्यान असलेल्या 100 हून अधिक अतिक्रमणे यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही सर्व अतिक्रमणे संबंधितांकडून तात्काळ काढण्यात यावीत असे आदेश देण्यात आले असून, नोटीस मिळाल्यापासून पुढील तीन दिवसानंतर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने जाहीर केले आहे.
राज्यमार्ग 76वर शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून 37 मीटर एवढी इमारत बांधकाम रेषा आहे. तर साधारण रस्त्यापासून 13 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम असू नये असे धोरण आहे. कोणत्याही वाहनांना अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमणे असल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्या मालकीच्या शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे हटविण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. या रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत असलेल्या डोणे फाटा ते नेरळ मिनी ट्रेन ट्रॅक नेरळ पेट्रोल सर्व्हिस या दरम्यान असलेल्या सर्व अतिक्रमणे हलविण्यात यावीत अशी नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली आहे. या रस्त्यावर नेरळ गावातील रस्ता दोन पदरी नसल्याने रस्ता अरुंद आहे आणि त्यात रस्त्याच्याकडेला अतिक्रमणे झाल्याने वाहनांना अडचणी निर्माण होतात. हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हालचाली करून नेरळ परिसरातील 100 हून अधिक अतिक्रमणे यांना नोटीसा बजावल्या आहेत. कर्जत- कल्याण राज्य मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उरण उप विभाग यांच्या अखत्यारीत येत असून, त्यांच्या मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शासनाच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या टपरीधारक दुकानचालकांना बजावण्यात आलेल्या नोटीसीनुसार डोणे-नेरळ कर्जत राज्यमार्ग दर्जाचा रस्ता असून, त्याचा अनुक्रमांक 76 असा आहे. या रस्त्याचा सा.क्र. 111/00 ते 116/730 या भागात 23.30 मी. रुंदीचे संपादन करण्यात आले असून, सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. सद्यस्थितीत या रस्त्याकरिता संपादित करण्यात आलेल्या जागेत करण्यात आलेले बांधकाम तसेच तात्पुरती टपरी आणि शेड अशा स्वरुपाचे बांधकाम हटवण्यात यावे असे सूचित केले आहे. शासकीय जागेत असलेले सदरचे बांधकाम अनधिकृत असल्याने सदर बांधकाम नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसात काढुन टाकण्यात यावे, अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या नोटिसांमुळे कर्जत-कल्याण रस्त्याने नेरळ गावच्या हद्दीत दुकाने थाट अतिक्रमण धारक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
