चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश
। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यभर गाजलेल्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कलम 160 अंतर्गत ही नोटीस बजावली असून, त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ते उद्या पोलिस ठाण्यात जाणार नाही. उलट पोलिस आधिकारीच त्यांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.