माथेरानमध्ये आता ‘आयुष्यमान भारत’ दवाखाना

रायगड जिल्हा परिषदेकडून शहरी भागामध्ये आरोग्य केंद्र

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था ग्रामीण भागासाठी काम करते. मात्र, रुग्णांना प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदमध्ये पर्यटक आणि स्थानिकांची आरोग्य काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने आयुष्यमान भारत दवाखाना सुरू केला आहे. माथेरान पालिकेच्या प्रशासक सुरेखा भणगे यांचा या आरोग्य केंद्रासाठी सतत पाठपुरावा होता आणि त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हा दवाखाना सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


माथेरान गावातील नागरिकांना वैद्यकीय उपचार लवकर उपलब्ध व्हावेत यासाठी जीजी हॉस्पिटल काम करीत आहे. मात्र नागरिकांच्या, पर्यटकांच्या आरोग्य सुविधेसाठी तात्काळ प्राथमिक उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी माथेरान या नागरी वस्ती असलेल्या गिरीस्थान नगरपरिषदेकडून रायगड जिल्हा परिषदेकडे प्रयत्न सुरू होते. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी माथेरानची धावती भेट घेतली होती. तेव्हा शहरी नागरी आरोग्य केंद्र मंजूर केले गेले आहे. त्यासाठी माथेरान पालिका आपल्या 15 वित्त आयोगाच्या निधीची तरतूद केली आहे. त्याआधी सदर आरोग्य केंद्रासाठी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदने प्रशासकीय पातळीवर ठराव घेऊन तात्पुरत्या स्वरूपात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या असेम्ब्ली हॉलची जागा उपलब्ध करून दिली आहे. कारण आरोग्याच्या दृष्टीने शहरातील शासकीय, माध्यवर्ती ठिकाण असल्याने रायगड जिल्हा परिषदेनेदेखील त्या जागेस मान्यता दिली होती.

पालिकेने तातडीने सर्व कामे पूर्ण घेतली असून, त्या आरोग्य केंद्राची पाहणी माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी केली आहे. लवकरच या आयुष्यमान भारत दवाखान्याचे लोकार्पण होणार आहे. आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी प्रसंगी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मिसाळ, पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख सदानंद इंगळे आणि पालिका रुग्णालयातील स्टाफ नर्स श्‍नेह गोळे उपस्थित होते. लवकरच आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्यवर्धिनी दवाखाना माथेरानमधील जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.

या आरोग्य केंद्रात स्वतंत्र डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि लॅब असणार आहे. नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वेळेत उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी नागरिकांना अत्यल्प कमी खर्च येणार असून, लवकरच सदर केंद्र सेवेत रुजू होईल.

सुरेखा भणगे, माथेरान पालिका प्रशासक
Exit mobile version