। वॉशिंग्टन । पीटीआय । वृत्तसंस्था ।
अमेरिकेत राहणार्या भारतीयांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. आता दिवाळीला अमेरिकेत प्रशासकीय सुट्टी म्हणून घोषित केले जाऊ शकते. अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये हा महत्त्वाचा ठराव मांडला आहे. कृष्णमूर्ती यांनी प्रतिनिधी सभागृहात ठराव मांडल्यानंतर सांगितले की, अमेरिका आणि जगभरात स्थायिक झालेल्या शीख, जैन आणि हिंदूंसाठी दिवाळी हा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. दिवाळीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व ओळखून, हा ठराव या महत्त्वपूर्ण प्रसंगी भारतीय-अमेरिकन आणि जगभरातील डायस्पोरा यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त करतो, असे कृष्णमूर्ती म्हणाले. दिवाळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखून हा द्विपक्षीय ठराव मांडताना मला अभिमान वाटतो असेही कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.