रेंट बाईकविरोधात आता न्यायालयात धाव

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागसह रायगड जिल्ह्यात रेंट बाईकने धुमाकूळ घातला आहे. स्थानिक रिक्षा व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेकवेळा प्रशासनाकडे दाद मागूनही त्यांच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे आता रेंट बाईकविरोधात न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे. ॲड.अजय उपाध्ये यांनी याबाबत तक्रार केली आहे.

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे. स्थानिकांना यातून रोजगाराचे साधन मिळत आहे. रिक्षा चालकांसह मिनीडोअर चालकांना यातून व्यवसाय उपलब्ध होत आहे. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाने बेकायदेशीर ठरविलेला रेंट बाईकचा व्यवसाय सध्या जोर धरत आहे. दुचाकी वाहने भाड्याने देण्याचा हा बेकायदेशीर धंदा खुलेआमपणे अलिबागमध्ये सुरु आहे. याबाबत रिक्षा चालकांनी वारंवार उपप्रादेशिक परिवहन पेण, अलिबाग पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखेकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडूनदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या रिक्षा व्यावसायिकांनी आता न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. अलिबाग ऑटो रिक्षा व्यावसायिक संघटनेच्यावतीने तक्रार करण्यात आली आहे. ॲड. अजय उपाध्ये यांनी याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन, न्यू इंडिया इन्सूरन्स कंपनीला नोटीस दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version