आता आधारभूत किंमतीसाठी लढाई

संयुक्त किसान मोर्चा आंदोलनावर ठाम
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शेतकरी आंदोलनाची दखल घेत तसेच आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत नरेंद्र मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी संयुक्त किसान मोर्चाने मात्र यापुढेही आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.जोपर्यंत सर्व पिकांच्या आधारभूत किंमतसाठी सरकार कायदेशीर हमी देत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील,असा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने केलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी संघटनांचे आंदोलन पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. 29 नोव्हेंबरपासून संसदेपर्यंत रोज ट्रॅक्टर मार्च काढण्याचेही नियोजन आहे. रविवारी झालेल्याा सर्व संघटनांच्या बैठकीत या दिशेने अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 670 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसाठी अनुदानाची मागणी करण्यात आली होती. तसंच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रोज 500 शेतकरी संसदेकडे शांततेत ट्रॅक्टर मोर्चा काढतील. हे अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, असे दर्शन पाल यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर सांगितले.

Exit mobile version