आता रुग्णालयातच मुलांच्या हाडांची तपासणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शुन्य ते 18 वयोगटातील मुलांच्या हाडांची तपासणी रुग्णालयातच सुरु करण्यात आली आहे. त्याची सुरुवात मंगळवारी (दि.27) रोजी करण्यात आली. मुलांची होणारी वणवण आता थांबणार असल्याने पालकांना त्यातून दिलासा मिळाला आहे.

अलिबागमध्ये जिल्हा रुग्णालयात लहान मुलांच्या अस्थिरोग तज्ञांचा अभाव असल्याने पालकांना अनेक वेळा खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करावे लागत होते. खासगी दवाखान्याचा खर्च न परवडण्यासारखा असल्याने अनेकवेळा मुलांवर अर्धवटच उपचार होत असतात. त्यामुळे दिव्यांगाचा धोका निर्माण होतो. जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सेवा अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुलांच्या तपासणीसाठी मुंबईमधील लहान मुलांचे अस्थिरोग तज्ञ मुदीत शाह, अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ आणि निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अशिष मिश्रा, डॉ. प्रतिष्ठा नाखवा, डॉ. निधा घट्टे, जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्राचे व्यवस्थापक गणेश भोसले, समन्वयक सूनील चव्हाण, ज्ञानदिप भोईर, ऐश्वर्या थळे आदींचा समावेश असून मंगळवारी दिवसभरात एकूण 30 हून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली असून या मुलांच्या हाडांच्या आजारावर मोफत शस्त्रक्रियादेखील केली जाणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.

Exit mobile version