आता दरडग्रस्तांना मानसिक आधाराची गरज

मानसोपचार तज्ज्ञ करताहेत धास्तावलेल्या मनांवर उपचार
। अलिबाग । भारत रांजणकर ।
महाड तालुक्यातील तळीये, पोलादपूर मधील सुतारवाडी आणि केवनाळे येथील दरड दुर्घटनांमध्ये 95 जण मातीच्या ढिगार्‍याखाली जिवंत गाडले गेले. या दुर्घटनेतून बचावले असले तरी आपल्या रक्तामांसाच्या जिवलगांसोबत झालेली ताटातूट यातून अजूनही मानसिक रित्या सावरलेली नाहीत. मागे उरलेले नातेवाईकांच्या डोळयाला रात्र रात्र झोप येत नाही. भविष्याबद्दल चिंता लागून राहिली आहे. मोठया प्रमाणावर सर्व प्रकारची मदत येत असली तरी चिंता आणि धास्तीमुळे भुकच मेली आहे. रात्री अचानक दरड कोसळत असल्याचा भास होऊन दचकून जाग येते. अचानक रडू कोसळते, चिडचिड होते. असे एक ना अनेक प्रकार घडत आहेत. हा सगळा मानसिक आधार गमावल्याचे लक्षण असल्याने जिल्हा आपत्ती विभाग आणि जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने या दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्यास सुरुवात केली आहे. त्यांना व्यक्त करुन त्यांच्या धास्तावलेल्या मनांवर मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी आपल्या टिमच्या सोबतीने समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे.
तळीये गावासाठी 22 जुलैची सायंकाळ काळ बनूनच आली होती. आयुष्यभर निसर्गाच्या कुशीत लहानाचे मोठे झालेल्या या डोंगरानेच घास घेत 35 कुटूंब उध्वस्त केले. या दुर्घटनेसह पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी आणि केवनाळे येथील 95 जणांना आपला जीव गमवावा लागला. कित्येक लोकांची घर तर जमीनदोस्त झालीच होती. पण कित्येकांची घरातली माणसं नातेवाईक काळा ने ओढून नेले होते. अनेक चिमुकल्या जीवांनी आपली जिवभावाची माणसं मृत्यूच्या जबड्यात जाताना दृश्य डोळ्यांनी पहिली होती. काही कुटुंबातील फक्त एकच व्यक्ति मागे उरली आहे. या लोकांना आतापर्यंत विविध भागातून खूप मदत पोहोचली होती. पण या आर्थिक मदती सोबत त्यांना खर्‍या अर्थाने गरज होती. ती मानसिक मदतीची, खंबीर होण्याची.
जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचार विभागाचे प्रमुख मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी सदर दरडग्रस्त जखमी तसेच मृतांचे नातेवाईक यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञ यांना मानसिक आधार देऊन मानसोपचार करण्याची कल्पना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांच्यासमोर मांडली. त्यावर त्यांनी तात्काळ परवानगी दिल्यानंतर डॉ अमोल भुसारे आणि डॉ अर्चना सिंह यांच्या नेतृत्वाखाली टिमने बुधवारी तळीये ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्यावर मानसोपचार करुन त्यांना आधार देत धीर दिला. स्वत मानसिक सक्षम बनण्यासाठी काय करावे याच मार्गदर्शन केले. हे एका दिवसात होणारे काम नसल्याने पुढील काही दिवस रोज त्या भागात जाऊन तिथल्या लोकांचे समुदेशन करुन या सार्‍यातून सक्षम बनवून त्यांना या दुःखाच्या दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ अमोल भुसारे यांनी सांगितले. डॉ भुसारे आणि डॉ सिंह यांच्या नेतृत्वाखालील टिममध्ये धनेश्‍वरी गोयर, भाग्यश्री खोत, यशोदा बेजंकल, सचिन नवाळे, राजेश वसावे, रंजिता खेडकर, विशाल दामोदरे, अमोल नारखडे आदींचा सहभाग आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरडग्रस्त ग्रामस्थांच्या धास्तावलेल्या मनांना आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. मानसीक आधाराची गरज असल्याने 10-12 दिवस हे काम सुरु राहणार आहे.
डॉ पद्मश्री बैनाडे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी

दरडग्रस्त ग्रामस्थ मानसिक रित्या पार कोलमडून गेले असल्याने त्यांना इतर मदतीबरोबर सर्वाधिक गरज मानसिक आधाराची आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जाणार आहेत.
डॉ अमोल भुसारे

Exit mobile version