आता प्रतीक्षा विकासकामांची…

नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर असंख्य समस्या मार्गी लावण्याचे आव्हान
| सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेली पाली नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व अडचणींवर मात करत अखेर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत होऊन पहिली नगरपंचायत निवडणूकदेखील पार पडली आहे. आता निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांसमोर असंख्य समस्या मार्गी लावण्याचे आव्हान आहेच. शिवाय, जनतेलादेखील विकासकामांची आस लागली आहे. पाली नगरपंचायतीची निवडणुकी शांततापूर्ण झाले. पाली नागरिकांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांकडून मोठी अपेक्षा आहे. पाली नगरपंचायतीला वारंवार भेडसावणार्‍या समस्या आता नक्कीच मार्गी लागणार, अशी आशा पालीतील नागरिक करत आहेत.


मागील वर्षानुवर्षे येथील असंख्य प्रश्‍न व समस्या जैसे थे आहेत. याशिवाय तीर्थक्षेत्र विकास नाही, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. कचरा व सांडपाण्याचे नियोजन नाही. नवीन बसस्थानकाला मुहूर्त नाही. ग्रामीण रुग्णालय प्रलंबित आहे. याकडेही नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यःस्थितीत जवळपास 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना अजूनही कार्यान्वित झालेली नाही. तसेच बाह्यवळण मार्ग अजून झालेला नाही. याबाबत राज्यशासनाने सन 2010 ला वाकण-पाली-खोपोली राज्यमार्गावर बलाप येथून बाह्यवळण मार्गाला मान्यता दिली आहे. तसेच रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग हा पाली-पाटनुस राज्यमार्ग 94 ला झाप गावाजवळ जोडला आहे. या मार्गालगत येणार्या शेकडो शेतकर्यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे याबाबत तोडगा निघालेला नाही. हा मार्ग अडचणीत अडकला आहे. त्यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी होते. पाली शहरातील पार्किंग व्यवस्था, महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय व्यवस्था असे अनेक प्रश्‍न नवनिर्वाचित नगरसेवक हे मार्गी लावतील, अशी पालीकर नागरिकांची अपेक्षा आहे.

Exit mobile version