दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे नाभिक समाज रस्त्यावर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी आहे, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा नाभिक समाजाकडून निषेध करण्यात येत असून, राज्यभर रस्त्यावर उतरुन निदर्शने करण्यात येत आहेत. या विधानामुळे दानवेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दानवे यांच्या याच विधानाचा निषेध करण्यासाठी नाभिक समाजाच्यावतीने मंगळवारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तर यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबद्दल अवमानकारक शब्द वापरुन तिरुपती बालाजी येथील नाभिक समाज तिरुमती बालाजी येथे येणार्‍या भाविकांची अर्धवट काम करून (टक्कल) सोडतो, अशी समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून, त्यांचं निषेध करण्यात येत आहे.
काही राजकिय नेतेमंडळी आमच्या समाजाबद्दल बोलून खिल्ली उडवित आहेत. नाभिक समाजाची आणि व्यवसायाची जाणूनबुजून बदनामी करत आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा येणार्‍या काळात त्यांच्याविरोधात तीव्र अंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाभिक समाजाने दिला आहे.

Exit mobile version