पौष्टिक मोदक प्रथम, झुणका मोदक द्वितीय

| रायगड | प्रतिनिधी |

गणपती आणि मोदक हे समीकरण म्हणजे आपली संस्कृती आणि परंपरा. ही परंपरा जपण्यासाठी दैनिक कृषीवलने मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. मोदक म्हटले की, नारळ, गुळाच्या मिश्रणाचा चव आणि सुवासिक तांदळाचे पीठ या पदार्थांच्या कलाकुसरीतून तयार केलेला पदार्थ. परंतु स्पर्धेमध्ये सादर झालेल्या मोदकांचे प्रकार आणि स्वाद पाहुन नामांकित हॉटेलच्या शेफना परीक्षण करणे सोपे गेले नाही. गुण देताना आपापसात बराच विचारविनिमय करावा लागला. या स्पर्धेत प्रतिभा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रतिभा पाटील यांनी बनविलेल्या पौष्टिक मोदकांनी परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकली. कृषीवल वृत्तपत्र समूहाने मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. अलिबाग वेश्वी येथील मॅपल आयवी हॉटेलच्या सभागृहात स्पर्धकांना त्यांनी केलेल्या पदार्थांची मांडणी आणि सजावट करण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रीती देवेंद्र म्हात्रे, सुनीता अनंत लोहार, पूनम चंद्रकांत पाटील, कविता विलास म्हात्रे, संजना संजय धुपकर, देवश्री मंगेश निगडे, लीना दीपक मोरे, प्रतिभा सचिन पाटील, अपर्णा अरुण नाईक, मृदला मधुकर नाईक, ललिता चंद्रकांत पाटील, दीपाली अजित म्हात्रे, प्रमिला प्रफुल्ल नाईक, तेजश्री वैभव काठे आणि रश्मी अभिजित वाळंज या स्पर्धकांनी सहभाग घेतला.

परीक्षकांनी प्रत्येक स्पर्धकाकडील मोदकाचा आस्वाद घेऊन त्यांना गुण दिले. सर्वच स्पर्धकांनी केलेली सजावट लक्ष वेधून घेणारी होती. यामध्ये जागतिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून बनविण्यात आलेल्या पौष्टिक मोदकांनी बाजी मारली. मोदक स्पर्धेत द्वितीय क्रमांक कविता म्हात्रे यांनी पटकावला. त्यांनी झुणका मोदक बनवून साऱ्यांनाच चकित केले होते. पूनम पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी शाही मोदक बनविले होते. यामध्ये त्यांनी अननस, जायफळ आणि सुकामेवा टाकलेले मोदक बनवून वाहवा मिळवली. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी प्रीती म्हात्रे ठरल्या. त्यांनी जास्वंद, पारिजातक, मका आणि आंब्याची पाने या आकाराचे मोदक बनवून शेफना थोडावेळ विचार करण्यास भाग पाडले. पान मोदक बनवून संजना धूपकर यांनी पाचवा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे देवश्री निगडे या छोट्या कन्येने अननस स्वादाचे मोदक बनवून स्पर्धेमध्ये सर्व महिलांना चांगली टक्कर दिली. देवश्रीचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. विजेत्या स्पर्धकांना कृषीवलचे संपादक राजेंद्र साठे, मॅपल आयवी रिसॉर्टचे मुख्य व्यवस्थापक तपन चक्रवर्ती, मुख्य शेफ विनायक शेडगे, सहाय्यक व्यवस्थापक संतोष मांजरेकर आणि कृषीवल टीमच्या वतीने पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

ग्रामीण भागातील महिला विविध क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. मोदक पाककला स्पर्धा कृषीवलने घेऊन महिलांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. आलेल्या महिला स्पर्धकांसाठी मोदक स्पर्धा होती. परंतु या स्पर्धकांनी मोदकाच्या पारंपरिक पद्धतीचे जतन करून वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला. या सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

चित्रलेखा पाटील,
महिला आघाडी प्रमुख,
शेतकरी कामगार पक्ष
Exit mobile version