कर्जतमध्ये पोषण माह कार्यक्रम संपन्न

| रायगड | विशेष प्रतिनिधी |

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कर्जत 1 व 2 च्या माध्यमातून पोषण माह कार्यक्रम कर्जत कृषी संशोधन केंद्र येथे नुकताच संपन्न झाला. सदर कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच पोषण माहमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

1 ते 30 सप्टेंबर कालावधीत पोषण माह साजरा करण्यात आला. याअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कर्जत बालविकास प्रकल्प कार्यालय, युनायटेड वे स्वयंसेवी संस्था यांनी केले होते. यावेळी पोषणावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम अंगणवाडी सेविकांनी सादर केले. तसेच पोषण हंडी, पोषण सेल्फी पॉईंट, पोषण आहार पाककृती प्रदर्शन, रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, कर्जत गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी स्वाती चांदेकर, शरयू तांबे यांच्यासह अंगणवाडी सेविका, बचतगट महिला, आशा स्वयंसेविका व युनायटेड वे संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

कुपोषण निर्मूलन कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून उत्तम काम सुरू आहे. गरोदर महिलांची काळजी घेतल्यास सुदृढ बालके जन्माला येतील व कुपोषणाला आळा बसेल. तसेच बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
Exit mobile version