डोक्यावर नारळ पडून जयेश गीते यांचा मृत्यूने पर्यटक धास्तावले
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
2 दिवसापूर्वी राजपुरी गावातील बोटीवर असणारे तांडेल जयेश पांडुरंग गीते वय 48 यांचा समुद्र किनारी शहाळी आणण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्या डोक्यावर नारळ पडल्याने जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे मुरुड समुद्रकिनार्याची सुरक्षा काळजीचे कारण बनली आहे. हि घटना शेकडो वर्षांनी घडल्याचे लोक सांगत आहेत परंतु मुरुड पर्यटनसाठी येणारे पर्यटक सर्वात जास्त वेळ या रस्त्यावर नारळाच्या झाडाखाली फिरत असतात. अशी घटना पुन्हा घडू शकते त्यासाठी पालिकेने किनारी रस्त्यावर नारळांच्या झाडांच्या खाली नायलॉन जाळी लावावी, अशी मागणी अनेक पर्यटक करत आहेत. तसेच त्या झाडांची निगा व स्वछता वेळेवर करणे गरजेचे आहे.
नारळाच्या खराब फांद्या, खराब नारळ व उंदरांनी खाल्लेली शहाळी तातडीने काढण्यात यावीत, पोलिसांनी याची पाहणी करून सुर्लक्षेबाबत नियोजन करण्याची गरज आहे. समुद्र किनारी उंच अशी नारळाची असंख्य झाडे आहेत. नारळ कधीच माणसाच्या अंगावर पडत नसल्याचे बोलले जाते. परंतु रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे ही घटना अपवाद ठरली आहे. मुरुडमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. समुद्र किनारी फिरताना त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. यासाठी नारळांच्या झाडाखाली नायलॉनची जाळी लावल्यास अपघात घडण्याची शक्यता कमी आहे.