पालकांसह पर्यटकांकडून मागणी
। माथेरान । वार्ताहर ।
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण 20 ई-रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असून उर्वरित 74 ई-रिक्षा सुध्दा लवकरच सुरू व्हाव्यात यासाठी श्रमिक हातरीक्षा चालक-मालक संस्थेच्या सदस्यांनी 14 जानेवारी पासुन ई-रिक्षा बंद ठेऊन बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबतचे लेखी पत्र या संस्थेच्या सदस्यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांना सादर केले आहे. ही सेवा बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समजल्यावर पालक वर्गासह पर्यटकांमध्ये नाराजीचे सावट पसरले आहे.
ई-रिक्षा बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. फिरावयास येणार्या जेष्ठ पर्यटकांना सुध्दा याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. नियमितपणे कॉलेजला जाणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुध्दा या बंदची झळ सोसावी लागणार आहे. त्यासाठी या ई-रिक्षांची सेवा बंद न करता शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणून सुरू ठेवाव्यात. याच ई-रिक्षा सुरू होण्यासाठी त्यावेळी शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच, ई-रिक्षा चालू ठेवून उपोषण करा, अशी मागणी पालकांसह पर्यटकांकडून होत आहे.
आम्ही आता दोन दिवस माथेरानमध्ये मुक्कामी आहोत. आम्हाला असे समजले आहे की या ई-रिक्षांची सुविधा 14 जानेवारीपासून बेमुदत बंद करणार आहेत. आमचे रिलेटिव्हसुद्धा माथेरान फिरायला 14 तारखेला येणार आहेत. त्यांना आम्ही सांगितले आहे की, येथे वाहतुकीची सुविधा ई-रिक्षामुळे छान झाली आहे. परंतु, हे बंद वगैरे होणार असेल तर दुसरीकडे फिरायला गेलेलेच बरे.
– मयांक भानुशाली, पर्यटक मुंबई
ई-रिक्षा सेवाभावी संस्थेचे उपोषणाबाबतचे पत्र आम्ही जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठविले आहे. त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यावर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ.
– राहुल इंगळे, प्रशासक, माथेरान