। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटीनियलचा शपथविधी पदग्रहण सोहळा हॉटेल मॅपल आयवी येथे नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी शपथविधी समारंभासाठी माजी प्रांतपाल लायन हनुमान अगरवाल व द्वितीय प्रांतपाल लायन मनिष लाडगे यांची विशेष उपस्थिती लाभली. 2022-2023 या चालू वर्षीच्या लायन अॅड. कला पाटील यांनी प्रेसिडेंट म्हणून शपथ घेतली व पदग्रहण केले. लायन संजय रावळे यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. लायन संदीप वारगे यांची सेक्रेटरी म्हणून व लायन आकाश राणे यांची जॉईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सर्वांनी समाजात आपण चांगले कार्य करून आपणावर जी जबाबदारी सोपविली आहे, त्याचे सार्थक करू अशी शपथ घेतली. लायन अॅड. अमित देशमुख यांनी ट्रेझरर तसेच लायन अॅड. भुपेंद्र पाटील यांनी जॉईंट ट्रेझरर म्हणून पदभार स्वीकारला.
या कार्यक्रमात एकूण नऊ नवीन लायन मेंबर्स यांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन डॉ. अॅड. निहा अनिस राऊत तसेच सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांनी केले. या प्रसंगी दोन स्पॉट अॅक्टिव्हिटी करण्यात आल्या. लायन संजय रावळे यांनी अंजनी तांडेल यांना डोळ्याच्या ऑपरेशनसाठी 20 हजार रुपयांचा चेक दिला. तर लायन अॅड. निहा राऊत व लायन अॅड. कला पाटील यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थी, गायिका, कीर्तनकार, सामाजिक संस्थांचे अध्यक्ष अशा एकूण 20 जणांच्या सामाजिक कार्याचा रोप व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी श्रीबाग लायन्स क्लबच्या ज्या मेंबर्सना गेल्या वर्षभरात पुरस्कार प्राप्त झाले होते, त्यांना ही ट्रॉफी व तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. अॅड. निहा राऊत यांनी केले.