रायगडात ओबीसींना मिळणार हक्काचे घरकुल

‌‘आवास’ योजनेसाठी ओबीसी लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी

| रायगड | प्रतिनिधी |

केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांमधून आता ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी यांची नावे स्वतंत्र करून त्यांची नव्याने यादी तयार करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश केंद्र सरकारने जिल्हा परिषदेला दिले असून गाव पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकार ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या घरकुल पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नवीन योजना आणण्यात येणार आहे. यासाठी ओबीसी प्रवर्गातील घरकुलासाठी पात्र असणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने घरकुल पात्र लाभार्थी ‌‘ड’ वर्ग यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीला आवास प्लस असे संबोधण्यात येते. या यादीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जामती प्रवर्गात मोडणाऱ्या घरकुल पात्र लाभार्थ्यांना वगळून ओबीसी, अल्पसंख्या आणि खुल्या प्रवर्गातील लाभार्थी यांची नावे आहेत. या आवास प्लस घरकुल पात्र योजनेच्या यादीत 18 हजार 570 लाभार्थी असून त्यांच्यातून आता ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थी यांचे नावे वेगळी काढण्यात येत आहे. यासाठी गावोगावी ग्रामसेवकांना कामाला लावण्यात आलेले आहे.

2011 च्या आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ज्या पात्र लाभार्थी यांची नावे घरकुलांसाठी आलेली नव्हती, मात्र घरकुल योजनेसाठी ते पात्र होती, अशांची नावे 2019 ला ऑनलाईन पध्दतीने माहिती घेवून त्यातून पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील 18 हजार 570 लाभार्थी कुटूंबाची यादी तयार करण्यात आली. या आवास योजनेतून आता 11 हजार 362 ओबीसी प्रवर्गातील घरकुल पात्र लाभार्थी यांची नावे स्वतंत्र करण्यात येत आहे. या ओबीसी पात्र लाभार्थींसाठी केंद्र सरकार नव्याने घरकुल योजनेची घोषणा करणार आहे. याबाबत अद्याप स्पष्ट सुचना नसल्या तरी पहिल्या टप्यात घरकुलासाठी पात्र असणाऱ्या ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र लाभार्थीं यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

आवास प्लसमधील पात्र लाभार्थी
आवास प्लस मध्ये रायगड जिल्ह्यातील कुटुंबांना घरकुल मिळणार आहे. यामध्ये अलिबाग 203, कर्जत 884, खालापूर 259, महाड 3707, माणगाव 1884, म्हसळा 2253, मुरूड 854, पनवेल 103, पेण 2166, पोलादपूर 1350, रोहा 2130, श्रीवर्धन 858, सुधागड 965, तळा 812 आणि उरण तालुक्यातील 142 कुटुंबांचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्यात हक्काचे घर नसणाऱ्या कुटुंबांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी कुटुंबांची स्वतंत्र यादी तयार झाली आहे. या सर्व कुटुंबांना निकषानुसार घरकुल मंजूर करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. आवास प्लस योजनेतून या कुटूंबाना हक्काचे घर मिळणार आहे.

प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा विकास यंत्रणा
Exit mobile version