तीन जण गंभीर जखमी
। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास खांब हद्दीत एचपी पेट्रोल पंप समोर कारचालकाने उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दीडच्या सुमारास सिद्धेश योगेश शिंदे (रा. खडक पाडा, कल्याण वेस्ट) हे आपल्या ताब्यातील कार घेऊन चिपळूण ते कल्याण असे मुंबई-गोवा महामार्गवरून जात होते. दरम्यान, खांब गावच्या हद्दीत आले असता त्यांनी एचपी पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली. या अपघातात आदित्य दिपू वर्मा (वय 38, रा. कमला देवी कॉलेज हेरीटेल, ठाणे) यांचा मृत्यू झाला. तर निलेश राधानी (वय 25, रा. कल्याण), सिद्धेध योगेश शिंदे (वय 26, खडक पाडा), आणि अमित विजय करपे (रा. खडक पाडा, कल्याण वेस्ट) हे तिघे जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहीती मिळताच कोलाड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.