हरिओम चित्रपटातील संवादावर आक्षेप

चित्रपटगृहाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगडच्या सुपुत्रानी हरिओम या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हरिओम या मराठी चित्रपटावरून सध्या नवा वाद सुरू झाला आहे. चित्रपटातील एका संवादावर समाजवादी पार्टीने आक्षेप घेतला आहे. हा संवाद एका विशिष्ट समुदायाबद्दल बोलला गेला असल्याचे सांगत चित्रपटातील या संवादाला विरोध करण्यात येत आहे. चित्रपटाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग काढणे म्हणजे मुंबईत येऊन पाणीपुरी विकण्याइतके सोपं नाही, असे सांगत हरिओम घाडगे आक्रमक झाले आहेत.

चित्रपटातील संवादात भैय्या महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीकडून हा संवाद चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा चित्रपटगृहाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही समाजवादी पार्टीकडून देण्यात आला आहे.

14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात काही अशी दृश्य आणि संवाद आहेत, ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे चित्रपटाच्या एका संवादावरून समाजवादी पार्टीने संताप व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टीचे कांदिवली चारकोप विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अझहर सिद्दीकी या संवादावर संतापले आहेत. त्यांनी थेट कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन निर्मात्यांनी हे संवाद चित्रपटातून काढून टाकावेत, अशी मागणी केली आहे.

चित्रपटात मुख्य नायकाच्या तोंडी असलेल्या संवादामुळे हा वाद निर्माण झाला आहे. पुरुषोत्तम भैय्या, हा माझा महाराष्ट्र आहे. जर मराठी माणसांची सटकली तर महाराष्ट्राच्या नकाशावरून तुला आणि तुझ्या भावाला गायब करू, असा संवाद हरिओम चित्रपटात आहे. आता सिद्दीकी यांनी यावर आक्षेप घेत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटातील उत्तर भारतीयांबद्दलचे चुकीचे शब्द काढून टाकावेत व निर्मात्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसं न झाल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version