अवजड वाहनांचा वाहतूकीला अडथळा

रेवदंडा पोलिसांचे दुर्लक्ष, अपघात होण्याची भिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

उसर येथील गेल कंपनीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणारे अवजड वाहने रस्त्यावरच पार्कींग केली जात आहेत. त्याचा नाहक त्रास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना होत आहे. अन्य वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे रेवदंडा पोलीसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. दुर्लक्षपणामुळे ऐन पावसाळ्यात अपघात होण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रोपेन – डिहायड्रोजनेशन आणि एकात्मिक पॉलीप्रॉपिलीन (पीडीएच-पीपी परियोजना) प्रकल्प अलिबाग तालुक्यातील उसर गेल कंपनीमध्ये उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम 2025 पर्यंत पुर्ण व्हावा यासाठी नोव्हेंबरपासून नव्या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. या प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे एक हजार 200 पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे सुमारे 40 टक्के काम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील हजारो बेरोजगारांना रोजगाराचे साधन खुले होण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रकल्पाच्या कामासाठी लागणारा माल अवजड वाहनातून आणताना वाहतूकीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. मागील काही महिन्यापुर्वी गोंधळपाडा येथे अवजड वाहनांतून पाईप रस्त्यावर पडले होते. सुदैवाने अपघात टळला. त्यानंतर खानाव ते वेळवली खानाव रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनामुळे वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. तसेच ही अवजड वाहने गेल कंपनीच्या समोर मुख्य रस्त्यावरच पार्कींग केली जात आहे. हा रस्ता अरुंद असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. त्यात वाहतूकीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. याबाबत गेल कंपनी प्रशासनासह स्थानिक पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत प्रवासी वर्गाकडून होत आहे. कंपनी प्रशासन अवजड वाहने पार्कींग करण्यास उदासीन ठरत असल्याचा फटका प्रवासांना बसत आहे.

गेल कंपनीमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. सध्या पावसाळामुळे अडचण येत आहे. मात्र लवकरच ती सुविधा उपलब्ध केली जाईल.

जितिन सक्सेना, महाप्रबंधक (मानव संसाधन विभाग)

पोलीस चौकी बंदच
गेल कंपनीमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. या ठिकाणी वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कंपनीच्या प्रवेश द्वारासमोरच पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस या युक्तीप्रमाणे रेवदंडा पोलीसांचा कारभार सुरु झाला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही चौकी बंद स्थितीतच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Exit mobile version