। मुरूड । वार्ताहर।
यंदा वातावरणात अनेक धक्कादायक बदल जाणवत आहेत. श्रावण महिन्यातच वाढत्या हिटच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने मुरूड तालुक्यातील जनता घामाघूम होताना दिसत आहे. मुरूड तालुक्यातील उष्णतेचा पारा 31 अंश सेल्सियसवर पोहोचला असून अनेकजणांना वाढत्या हिटचा मोठा त्रास होत असल्याने बाहेर पडणे टाळत आहेत. दुपारी बाजारपेठांमधून सामसूम पाहायला मिळत आहे.
गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाची हुलकावणी सुरू असल्याने तापमान 25 वरून 31 अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. घरात उकाड्याने मुरुडकर घामाघूम होऊन हैराण झाले आहेत. पावसाचे वातावरण निर्माण होते. प्रत्यक्षात पाऊस पडत नाही असा प्रकार नागरिक आणि शेतकरी बंधू अनुभवत आहेत. पावसाचे 3 महिने संपत आले असून श्रावण महिन्यापासूनच उकाडा वाढल्याने वेगवेगळ्या आजारांनी डोके वर काढल्याचे रूग्णालयातून दिसून येत आहे. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. पर्यटकांनादेखील वाढत्या तापमानाचा त्रास होण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. आमच्या तरूणपणात असा प्रकार अजिबात होत नसे. सर्व ऋतूंचे वेळापत्रक वेळच्या वेळी पूर्ण होत असे. आता वातावरणातील होणारा असा बदल धोकादायक ठरणारा आहे असे मत अनेक जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.
पाणथळ भागात भात शेती तग धरून आहे. मात्र पाऊस थांबल्याने लावलेली उखारू भातशेती सुकायला सुरुवात झाली आहे. हिट वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने उखारू भातपिकाला धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत 2349 मिमी पाऊस पडला असला तरी जमिनीत पाणी मुरले नसल्याने हवेत गारवा राहत नाही. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे भातपीक सुकण्याची शक्यता आहे. शिघ्रे, वाणदे, जोसरांजन, विहूर, नांदगाव, गावी उखारू जमिनीत केवळ एक दोन सरी पडत असल्याने भातपीक जेमतेम तग धरून असल्याची माहिती शेतकरी रघुनाथ माळी यांनी दिली.