तापमान 32 सेल्सियस, भातपिकाला पोषक वातावरण
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
यंदा मुरूड तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जमिनीत पाण्याची उफळ झालेली नाही. त्यामुळे पाऊस थांबला की तापमान वाढते, असा अनुभव मुरूडकर घेताना दिसून येतात. तरीही ऑक्टोबर हिट भातपिकासाठी गरजेची आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. तालुक्यात आता ऑक्टोबर हिटच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी दुपारी तालुक्यातील तापमान 32 सेल्सियसवर पोहोचल्याने नागरिक घामाघूम झालेले दिसत होते.पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असला तरी रविवारी 30 टक्केच पर्यटक मुरूडमध्ये दिसून येत होते. आगामी आठवड्यात पर्यटकांची मोठी वर्दळ वाढण्याचे संकेत पर्यटन व्यावसायिकांनी दिले आहेत. प्रसिध्द काशीद बीचपासून नांदगाव, मुरूड बिचवरील सर्व स्टॉल्स, हॉटेलिंग, लॉजिंग, घरगुती निवास, खानावळी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. जंजिरा जलदुर्गदेखील पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने पर्यटक आणि व्यावसायिकांतून समाधानाचे वातावरण आहे.
शिघ्रे या गावचे ज्येष्ठ शेतकरी आणि स्टॅम्पवेंडर रघुनाथ माळी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी रोपे पिवळी होऊन भातपीक तयार होत आले आहे. पाऊस सरासरी इतका पडला नसला तरी समाधानकारक आहे. वेळीच पाऊस थांबल्याने भातपीक तरारून आलेले दिसून येत आहे. मुरूड तालुक्यात तीन हजार हेक्टर जमिनीवर भातपिकाची लागवड केली जाते. यंदा भाताचे उत्पादन उत्तम होईल, अशी माहिती रघुनाथ माळी यांनी दिली.