अधिकाऱ्यांनो, मुख्यालय सोडू नका!

सीईओंचे पशुसंवर्धन विभागाला पत्राद्वारे आदेश


| कर्जत | प्रतिनिधी |


जिल्हात नव्याने रूजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीच डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिका-यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश पत्राद्वारे सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सध्या राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याची झळ रायगड जिल्ह्यालादेखील बसली. या पार्श्वभूमीवर सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात राहून सेवा देणे कर्तव्य असून, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी संपर्क करून त्यांना रोगाविषयी माहिती देऊन प्रशिक्षण तसेच रोगाबाबत जनजागृती करावी, तसेच सेवा देण्यास कसूर करू नये. जनावरांविषयी माहिती तसेच गोठा साफसफाई कसा ठेवावा, योग्य वेळी फवारणी करावी, याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही पत्रात नमूद केले आहे.

जे पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहणार नाहीत, सेवा देण्यास कसूर करतील, त्यांचे घरभाडे बंद करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. बास्टेवाड यांनी पत्रात नमूद केले आहे. कर्जत तालुक्यातील बहुतांश पशुवैद्यकीय डॉक्टर हे निवासस्थानी राहातच नाही. यावर डॉ. बास्टेवाड काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version