अधिकारी जाणार शाळेत

शासनाचे चला शाळेत जाऊया अभियान; भौतिक सुविधांसह शाळेची तपासणी करणार

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्यासाठी राज्यभरात चला शाळेत जाऊया अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन अभियानात सहभागी होणार आहेत.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानादरम्यान शिक्षण विभागातील अधिकारी 22 व 23 सप्टेंबर आणि 7 व 8 ऑक्टोबरला संबंधित जिल्ह्यातील शाळांना भेटी देतील. त्यांच्या भेटीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अध्यक्ष हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. ते दर 15 दिवसांनी कामांचा आढावा घेऊन शिक्षण आयुक्तालयास अहवाल सादर करावा लागणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा विभागाचा केंद्रबिंदू असून, विद्यार्थ्यांची वाचन, लेखन आणि आकलन क्षमता वाढविणे, मराठी शाळांबाबत समाजाचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्तेची नवी उंची गाठणे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला जाणार आहे.

आदर्श उपक्रमांचा राज्यभर प्रसार
राज्यातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्या समाजाच्या सहभागातून उल्लेखनीय काम करीत आहेत. काही शाळांनी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि उद्योग समूहांच्या सीएसआर निधीच्या मदतीने शाळांचा कायापालट केला आहे. अशा आदर्श उपक्रमांचा राज्यभर प्रसार केला जाणार आहे.
Exit mobile version