ऑफलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना

रायगडातील विद्यार्थी,पालकांकडून स्वागत
। अलिबाग । वैभव पाटील ।

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईननेच घेण्याच्या निर्णयाचे रायगडातील पालक,विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून,यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना मिळेल,असा आशावाद व्यक्त केला जात आहे. विद्यार्थी जीवनात दहावी-बारावी टर्निंग पॉइंट मानला जातो. मात्र, कोरोनाच्या चढउताराने यंदा शाळाच बंद असल्याने शिक्षणावर कमालीच्या मर्यादा आल्या. समाधानाची एकच बाब म्हणजे यावेळी बाजारात पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध होती आणि अनेकांनी ती घेतलीही होती. कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरु केले. शिक्षकांप्रमाणेच सर्व विद्यार्थी, पालकांसाठी हा कसोटीचा काळ होता. त्याच अनुशंगाने ‘हिंदुस्थानी भाऊ’ याच्या पोस्टनंतर दोन दिवसांपूर्वी हजारो शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती. मात्र सरकारने ती मागणी फेटाळून लावत ऑफलाईनला प्राधान्य दिल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सद्यस्थितीत दहावी-बारावीच्या जवळपास 32 लाख विद्यार्थ्यांपैकी 70 टक्क्यांपर्यंत विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीणमधील अनेक गावांमध्ये नेटवर्कचा अडथळा आहे. दुसरीकडे बारावीचे जवळपास 188 तर दहावीचे दीडशेहून अधिक विषय आहेत. दोन्ही वर्गांची आठ माध्यमातून परीक्षा घेतली जाते. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे सद्यस्थितीत अशक्य आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे मत शिक्षणविभागाने दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.


Exit mobile version