| कोर्लई | वार्ताहर |
पावसाळ्यात मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा पर्यटनासाठी बंद असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. समुद्रकिनारी जाण्यास सक्त मनाई असल्याचे फलक देखील त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तरीदेखील काही हौशी पर्यटक समुद्रात जाण्याचं धाडस करून आपला जीव गमावत आहेत. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून उधाणाच्या भरतीने समुद्रकिनाऱ्यावर तेल वाहून आले आहे. त्या तेलाचे डाग किनाऱ्यावर पसरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे किनारा विद्रुप झाला असून तेलाचा उग्र वास देखील सुटलेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्यासह समुद्रातील जीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर त्वरीत उपाययोजना करून किनाऱ्यावर पसरलेले तेल साफ करावे, अशी मागणी जोर धरत आहे.






