। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड समुद्र किनार्यावर मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण समुद्रकिनारा विद्रुप दिसु लागला आहे. लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष समुद्रकिनार्यावर पसरल्याने येणारे पर्यटक व शतपावली करणारे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुरूड समोरील समुद्रातून मुंबई, गोवा, केरळकडे जाणारा मुख्य समुद्र मार्ग असल्याने रात्री किंवा सकाळी मोठी जहाजांची ये-जा सुरू असते. शिवाय खोलवर समुद्रात परराज्यातील मोठ्या नौका मासेमारी करतात. मोठ्या यांत्रिक जहाजांचे मोठ्या नौकांचे जळलेले ऑइल कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते. हा तेलाचा तवंग लाटांसोबत किनार्यावर येतो. काही वेळा हा तवंग वाळूच्या संपर्कात आल्याने त्यांच्या डांबरसदृश गोळ्या तयार होतात. अशा या गोळ्यांमुळेच मुरुड समुद्र किनारा समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे. तेल तवंगाचे दुष्परिणामामुळे समुद्रातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. यामुळे छोट्या मच्छीमारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या तवंगामुळे मासेमारीसोबत पर्यटनावरही परिणाम होतो. तसेच ऑइल पसरल्याने किनार्यावरील वाळूवर चालता येत नाही. बूट, चप्पल यांना ऑईलचे गोळे चिकटून खराब होत असून किनार्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे.