प्रतिकूल वातावरणाचा परिणाम
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
निसर्गाचे ॠतुचक्र बदलले असल्याचा अनुभव सृष्टीतील प्रत्येक जीवास अनुभवला आहे. याच पार्श्वभूमीवर वातावरण बदलाचा परिणाम ऑलिव्ह रिडले कासवाच्या प्रजननावर झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतिकूल वातावरणामुळे गतवर्षी कासवाचे अंडी घालण्यासाठी किनार्यावरील आगमन उशिरा झाले होते. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रतिकूल वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही कासवांचे समुद्रकिनार्यावरील आगमन उशिरा होणार की ठरलेल्या वेळेनुसार होणार? याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. सर्वसाधरणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. या कालावधीमध्ये मादी कासव वालुकामय भागात हायटाईड लेव्हलपासून सुमारे 50 ते 100 मीटर अंतरावर 1 ते 15 फूट खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते.
जिल्ह्याच्या अन्य भागातील सागरी किनारपट्टीवर आढळणार ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव वा त्याची अंडी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर आढळली नव्हती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील माडबनच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालण्यासाठी साधारण डिसेंबर महिन्यामध्ये येत असल्याचे आढळून आले.
किनार्यावरील वाळूमध्ये कासवाच्या मादीने घातलेल्या अंड्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून स्थानिक ग्रामस्थांसह वनविभागाने उपाययोजनाही वेळोवेळी केल्या आहेत. त्यातून अंड्यामधून बाहेर पडलेल्या इवल्याशा कासवांच्या पिल्लांचा जन्मानंतरच्या सुखद समुद्रप्रवास माडबनवासियांना अनुभवला आहे.