कळंब जवळील पुलावर स्लॅबच्या लोखंडी जाळ्या बाहेर

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत-मुरबाड रस्त्यावरील कळंब गावानजीकच्या पोशिर नदीवरील पुलावर लोखंडी जाळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे अपघात होऊ शकतात. शिवाय हा तीन जिल्ह्यांना जोडणारा पूल कमकुवत होऊन त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती धोंडू राणे यांनी केली आहे.

कर्जत-मुरबाड राज्य मार्गावर कळंब गावानजीक पोशिर नदीवर सन 1964-65 मध्ये पूल बांधण्यात आला होता. या पुलावरून त्यावेळी जड वाहतूक होत नव्हती. मात्र आता या पुलाचे रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्हा जोडला असून अति जड वाहनांची रहदारी या रस्त्यावरून होत असते. जेएनपीटी, मुरबाड औद्योगिक क्षेत्र, खोपोली, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील माल वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. हा रस्ता चांगला तसेच जवळचा असल्याने या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक लक्षणीय आहे.

या पुलावरील स्लॅबच्या लोखंडी जाळ्या बाहेर आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्लॅबची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करावी अन्यथा हा पूल कमकुवत होऊ शकतो, असे माजी सभापती धोंडू राणे यांचे म्हणणे असून चार वर्षांपूर्वी पोशिर नदीवरील माले गावाजवळील पुलावरील संरक्षित कठड्याचे लोखंडी पाईप अज्ञातांनी चोरून नेले होते. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर लगेचच तेथील संरक्षित कातड्याचे पाईप बसविले. त्याच प्रमाणे या पुलावरील स्लॅब चांगल्या प्रकारे लवकरात लवकर दुरुस्त करावा. अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version