। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्याचे मुख्यालय असणार्या अलिबाग येथे चेंढरे मार्गावरील रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे अर्धा रस्ताच गायब झाल्याने भल्या मोठया खड्डयांमुळे धोकादायक अर्ध्या रस्त्यावरील वाहतूकच उरली होती. याची तातडीने दखल घेत अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत सिंमेट काँक्रीटने भरून काही प्रमाणात वाहतूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
हा रस्ता नॅशनल हायवे अंतर्गत येत असून, अनेक नागरीकांनी हे खड्डे भरण्यासाठी तक्रारी करून देखील, याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र प्रशांत नाईक यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून सदर रस्त्याची दुरुस्ती केल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.
अलिबाग-पेण रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा संबंध नाही. दयनिय अवस्था असलेल्या या मार्गावर मोठया प्रमाणावर खड्डयांचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येकवेळी थातूर मातूर दुुरुस्ती करीत खड्डे भरले जातात. मात्र पंधरा ते वीस दिवसांच्या आतच केलेली तात्पुरती मलमपट्टी निघुन हे खड्डे पुन्हा आपले डोकं वर काढत असतात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे पर्यटक, प्रवाशी, तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांचे मोठया प्रमाणावर हाल होत होते. मुख्यालय असणारे अनेक कार्यालयांचे मुख्य कार्यालय देखील अलिबागमध्ये आहेत. त्यामुळे सर्व उच्चपदस्थ अधिकारी याच मार्गावरुन प्रवास करतात. तरी देखील या रस्त्याचे हाल संपत नसल्याकडे लक्ष वेधले होते.
जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्याचप्रमाणे प्रसृतीसाठी मोठया प्रमाणावर गोर गरीब गर्भवती महिला देखील प्रवास करीत असतात. मात्र हा रस्ता इतका नादुरुस्त झाला आहे की एखादवेळी खड्डयांमुळे एखाद्या महिलेची गाडीतच प्रसृती होण्याची भीती देखील वर्तविण्यात आली होती. तातडीने बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्याने नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबाग बायपास रोड, सुमन हॅाटेल समोर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे सिंमेट काँक्रीटने भरून काही प्रमाणात वाहतूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हा रस्ता नॅशनल हायवे अंतर्गत येत असून, अनेक नागरीकांनी हे खड्डे भरण्यासाठी तक्रारी करून देखील, याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
सिमेंटने खड्डे भरण्यास सुरुवात केली. पावसाने देखील साथ दिल्याने सदर रस्त्याची दुरुस्ती पुर्ण झाली आहे. या दरम्यान सदर रस्त्यावरील वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती.