दिवाळीनिमित्त बाजार फुलांनी बहरला

झेंडू प्रतिकिलो शंभरीपार

| वाशी | प्रतिनिधी |

नवरात्रौत्सव आणि दसरा झाल्यानंतर आता लगेचच दिवाळीनिमित्त एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांनी एपीएमसी बाजार परिसर बहरून निघाला आहे. दिवाळीत झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिक झेंडू खरेदी करण्यासाठी बाजार परिसरात मोठी गर्दी करत आहेत. झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नागरिकांच्या खिशाला मात्र ऐन दिवाळीत कात्री लागलेली पाहायला मिळत आहे. सध्या वाशीतील एपीएमसीत कमी प्रतीचा झेंडू 100 ते 120 रुपये; तर आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू 200 ते 250 रुपये किलोने विकला जात आहे.

दिवाळीत दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण, दुकानांची सजावट, वाहनांना झेंडूच्या माळा बांधण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या वेळी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. मागील तीन-चार वर्षे झेंडूच्या फुलांना मागणी नसल्याने उत्पादकांवर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. शेतकरीदेखील झेंडूची लागवड करण्यास धजावत नव्हते. तसेच, यंदा परतीच्या पावसामुळेदेखील झेंडूच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते; मात्र तरीही झेंडू फुलाला दसर्‍यापासून चांगला दर मिळत असल्याने शेतकर्‍यांकडून दिवाळीत चांगली कमाई होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जून-जुलै महिन्यात लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांची तोडणी करून झेंडू बाजारात विक्रीस आणला गेला आहे.

हॉटेल, दुकाने, वाहने सजावटीसाठी मानदिवाळीनिमित्त बाजार परिसर झेंडूच्या फुलांनी बहरला असला तरी झेंडूच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्यात 40 ते 60 रुपये दराने विकल्या जाणार्‍या झेंडूचे दर तब्बल दोन ते तीन पटीने वाढले आहेत. सध्या वाशीतील एपीएमसीत कमी प्रतीचा झेंडू 100 ते 120 रुपये किलोने विकला जात असून, आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू 200 ते 250 रुपये किलोने विकला जात आहे. मोठमोठी आस्थापने, हॉटेल्स, दुकाने, वाहने, घर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर झेंडू आणि इतर फुले खरेदी केली जात असल्याने मोठ्या व्यापार्‍यांना त्याचा फायदा होत आहे; मात्र वाढत्या महागाईत दिवाळीच्या सणातील इतर खर्च आणि सणाच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागली आहे.

एपीएमसीतील इतर फुलांचे दर : फुले किलो/नगाचे भाव (रु.)
मोगरा-900, कणेरी-320, शेवंती-320, जरबेरा-200, चाफा 3 नग – 50, गुलाब 1 नग- 30, जास्वंदी 2 नग- 30, कमळ-1 नग – 40

दिवाळी सणानिमित्त झेंडूच्या फुलांची मागणी जास्त असल्याने भाव वाढले आहेत. फुलांच्या वाढत्या किमतीमुळे तीन ते चार किलो फुले खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा किलो, एक किलो खरेदी करीत आहेत. त्याशिवाय इतर फुलांचे दरदेखील वाढल्याने ऐन दिवाळीत फूल विक्रेत्यांमध्ये मंदीचे वातावरण आहे. तसेच, लक्ष्मीपूजनानंतर बाजारात मालाची कमतरता निर्माण होऊन फुलांचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

– शैलेंद्र यादव, फूलविक्रेता, वाशी

Exit mobile version