गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची यूरोप, अमेरिका स्वारी

कोकणातूनच 40 हजार पेट्या आंबा

। रायगड । प्रतिनिधी ।

गुढीपाडवाच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या 50 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. स्थानिक बाजारेपेठेत गुढीपाड्यामुळे आंब्याला चांगली मागणी होती. हापूस आंब्यांच्या पेटीला 2 ते 5 हजार एवढा दर होता.

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी मार्केटमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी पाठवत असतात. रविवारीदेखील मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांचा 40 हजार 364 पेट्या दाखल झाल्या. तसेच इतर राज्यातील 10 हजार 518 पेट्या दाखल झाल्या आहेत. दरवर्षी या प्रमाणात पेट्या मार्केटमध्ये दाखल होत असतात. विशेष म्हणजे कोकणचा हापूस निर्यात होण्यास सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असते.

किरकोळ बाजारात दर चढेच
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचे उत्पादन 30 टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे आंब्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गुढीपाडव्या दरम्यान आंब्यांची पेटी 2,500 ते 3,000 रुपयांना मिळत होती. यंदा हे दर 3,500 ते 4,000 रुपये आहे. तसेच एका डझन हापूस आंबा 900 ते 1,500 रुपये डझन मिळत आहे.
अवकाळीचा आंबा पिकाला फटका
कोकणची अर्थव्यवस्था आंब्या पिकावर आहे. परंतु लहरी निसर्गाचा फटका आंब्यांला सध्या बसत आहे. सध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आल. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हापूस आंब्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. केवळ 25 ते 30 टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे . उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागातदार मेटाकुटीला आला आहे. हापूस आंब्यांचा हंगाम दरवर्षी जून महिन्यातही असतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात हापूस मिळतो. मात्र, यंदा हापूसचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. तसेच आंब्यांची आवक 10 एप्रिल ते 10 मे या दरम्यान वाढणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Exit mobile version