| मुंबई । वृत्तसंस्था ।
बाजार समितीत हापूस निर्यातीला सुरुवात
यंदा हापूस आंब्यांचे जास्त उत्पादन होईल, अशी आशा व्यापार्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, यंदा हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि अवकाळी पाऊस यामुळे मोहोर गळून पडला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. तसेच हापूसची वाढदेखील खुंटली आहे.
आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. एपीएमसी बाजारात मार्च-एप्रिलपासून आंबा आवक मोठ्या प्रमाणावर सुरुवात होत असते. परंतु यंदा हवामान बदल, अवकाळी पाऊस तसेच कडक उन्हामुळे हापूस उत्पादनावर परिणाम झाला असून, कमी उत्पादन आहे. एपीएमसी बाजारात दरवर्षी होणारी आवक कमी होत आहे. एपीएमसी बाजारात 5 ते 7 डझनच्या पाच हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. तर पेटीला 2 ते 6 हजार रुपये बाजारभाव आहेत. आखाती देशात हापूस निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून आंबा निर्यात करावी लागते. आंबा निर्यातीकरिता आंब्याचा आकार, वजन, आणि दर्जा महत्त्वाचा असतो. आता हापूस निर्यातीला सुरुवात झाली असून पुढील काळात हापूसची निर्यात कशी असेल हे स्पष्ट होणार आहे.