पर्यावरण व निसर्ग अभ्यासकांनी व्यक्त केली चिंता
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागड सह जिल्ह्यात रान फळे-फुल झाडे व पक्षांचा हंगाम ऐन बहरात आहे. मात्र मागील काही दिवसात सुधागड, पोलादपूर, महाड, माणगाव आदी ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका येथील पर्यावरणातील रानफळे फुले व पक्ष्यांना बसला आहे. ऐन बहरात आलेली रानफुले व फळांचे नुकसान झाले आहे. परिणामी पक्षांची खाद्यासाठी परवड होताना दिसत असल्याचे निरीक्षण येथील पक्षी व निसर्ग अभ्यासकांनी नोंदविला आहे.
सद्य परिस्थिती काजू, आंबा, फणस, करवंद, जांभूळ, कण्हेर अशा विविध झाडांच्या मोहराचा बहर असल्याने या अवकाळी पावसामुळे या झाडांचा मोहोर पडून जातो आणि या झाडांच्या फळांना फटका बसला. फक्त झाडांनाच नाही तर या झाडांच्या मोहोरा मधील मकरंद पिण्यासाठी येणार्या कीटकांना व पक्षांना देखील याचा फटका बसून परागीभवनावरती याचा परिणाम होतो.
फेब्रुवारी ते मे हा शिकारी पक्षांच्या विणीचा हंगाम असल्याने त्यांची घरटी उंच झाडावर बनवलेली असतात. या अवकाळी पाऊस व सोसाट्याचा वार्याने पक्षांची घरटी मोडली असल्याची भीती पक्षी प्रेमींनी व्यक्त केली. फेब्रुवारी ते मे च्या कालावधीमध्ये घार, शिक्रा, माहोळ घार, तिसा, मोरघार, सर्पगरुड, सामान्य खरूची या शिकारी पक्षांची घरटी असतात. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल, पाचू कवडा, टोई पोपट, पोपट, भारद्वाज ,कावळा, कोकिळा या पक्षांची झाडाच्या फांदीला आणि झाडाच्या ढोलीत बीळ तयार करून बनवलेली घरटी असतात तर वेडा राघू या पक्षाची घरटी मातीमध्ये असतात, अवकाळी पावसामुळे घरट्यात पाणी शिरल्याने या पक्षांची पिल्ले दगावतात आणि घरटी देखील उन्मळून पडतात. बगळे, पाणकावळे, साळुंख्या, बदक, कावळे, चिमण्या या सारखे पक्षी रात्रीच्या वेळी विसाव्यासाठी झाडांवर थव्याने बसलेले असतात. मात्र अवकाळी पावसामुळे त्यांची फरपट होते.
अन्नासाठी धडपड
अवकाळी पावसामुळे कीटकांची संख्या कमी झाल्याने या पक्षांवर उपासमारीचे संकट उभे राहते. कारण स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे पक्षांना अन्नाची उपलब्धता जास्त प्रमाणात असते. तर ढगाळ हवामानाचा परिणाम झाल्याने कीटकांची संख्या रोडावते, याच दरम्यान फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान काही फुलांचा बहर असतो. काटे सावर, पांगारा, पळस, कवची, पिनारी पिचकारी, गुलाबी जाम, धामण, बहावा, अंजनी या फुलांतील मकरंद शोषण्यासाठी विविध कीटक व पक्षी या झाडावरती दिसून येतात. अवकाळी पावसाने या झाडातील फुलांमध्ये पाणी गेल्याने किंवा सोसाट्याच्या वार्यामुळे फुलं गळून पडल्याने या कीटक व पक्षांवर उपासमारीचे संकट उभे राहते. प्रामुख्याने चार प्रजातींचा सूर्य पक्षांवर याचा अधिक परिणाम दिसून येतो कारण ते फुलांतील मध शोषून घेतात.
कीटकांची वाताहत
या अवकाळी पावसाचा फटका फक्त पक्षांना नाही तर कीटकांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो. कारण विविध झाडांच्या फांद्यांना मातीच्या सहाय्याने हे कीटक आपले घरटे बनवत असतात आणि या पावसामुळे मातीपासून तयार केलेली त्यांची घरटी पूर्णतः किंवा अंशतः ढासळतात त्यामुळे त्यांची अंडी आणि पर्यायाने छोटी पिल्ले मरतात.