शिवसेना उबाठाचे आमदार हारून खान यांचा आक्रमक पवित्रा
| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, विधानसभेत गेल्या चार दिवसांपासून विरोधक विविध प्रश्नावरून आक्रमक होत सरकारला धारेवर धरत आहेत. अशावेळी विधानसभेत वर्सोवा चे शिवसेना उबाटाचे आमदार हारून खान यांनी थेट सुधागड तालुक्यातील वीज समस्येवर विधिमंडळात आवाज उठवला. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मात्र अशा ज्वलंत प्रश्नावर येथील स्थानिक आमदारांनी आवाज न उठवल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मात्र असंतोष आहे.
सुधागड तालुक्यातील वाघोशी गावामध्ये 4 दिवस वीज पुरवठा खंडित होतो. पावसाळ्यात विजेचे खांब पडतात आणि मग महावितरण काम करतात. मात्र पावसाळ्यापूर्वीच महावितरण धोकादायक खांब बदलण्याचे व दुरुस्ती करण्याचे काम का करत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. नुकताच वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा व मुख्यालयी राहणारा लाईनमन मिळावा याकरिता वाघोशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालीतील महावितरण कार्यालयाला घेराव घातला होता. याबाबत आता विधिमंडळ मध्ये आवाज उठवल्याने कदाचित आतातरी वाघोशी पंचक्रोशीतील नागरिकांना न्याय मिळेल समस्या मार्गी लागेल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
स्थानिक आमदारांना विसर
विशेष म्हणजे येथील स्थानिक आमदारांनी कधीही या प्रश्नांवर आवाज उठवला नाही. मात्र वर्सोवाचे शिवसेना उबाठाचे आमदार हारून खान सुधागड तालुक्यातील विजेच्या प्रश्नावर आवाज उठविल्याने सुधागडच्या जनतेनी त्यांचे आभार मानले आहेत व स्थानिक आमदारांना देखील इथल्या प्रश्नावर आवाज उठवावा अशी अपेक्षा केली आहे. या संदर्भात सोशल मीडिया वरती देखील नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.