प्रवाशांची होत आहे गैरसोय
| सोगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकात शौचालयाची बुधवार, दि. 2 जुलै रोजी दुरवस्था झाल्याचे पत्रकार सोगावकर यांनी रेल्वे स्थानकावर मुख्य रेल्वे स्टेशन अधिकारी अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत रेल्वे अधिकारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत शौचालय पूर्ववत करण्याचा आदेश रेल्वे कर्मचारी यांना दिल्याने काही वेळातच शौचालय पूर्ववत सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला.
पनवेल रेल्वे स्थानकात तीन व चार फलाट क्रमांकाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे, पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वारासमोर एक शौचालय व फलाट क्रमांक चार येथील अंतर्गत पुलाखाली काही महिन्यांपूर्वी नवीन शौचालय बांधण्यात आले आहे, तर फलाट क्रमांक पाच वर एक असे एकूण तीन शौचालये आहेत. विस्तारीकरण कामामुळे प्रवेशद्वारासमोर असलेल्या शौचालय बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वच प्रवाशांना शौचालयाचा वापर करण्यासाठी नवीन बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकात जावे लागत होते. मात्र, लोकल प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत ते अपुरे पडत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.
बुधवार, दि. 2जुलै रोजी दुपारच्या वेळी सदर नवीन शौचालय बंद पडून घाण पसरून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते, त्यामुळे महिला प्रवाशांसह सर्वच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली असल्याचे पत्रकार अब्दुल सोगावकर यांनी शौचालयाची दुरवस्था मोबाईलमध्ये कैद करून रेल्वे मुख्य प्रशासनाकडे याबाबत तक्रार करत झाडाझडती घेतली. यावेळी रेल्वे मुख्य प्रशासन अधिकारी अग्रवाल यांनी स्वतः पाहणी करत याची गंभीर दखल घेऊन शौचालयाची पाहणी करून त्वरित रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाचारण करत शौचालय ताबडतोब सुरू करण्यात यावे, असे आदेश देत स्वतः जातीने उपस्थित राहून काही वेळातच शौचालय पूर्ववत सुरू केले. यावेळी उपस्थित अधिकारी अग्रवाल यांनी पत्रकार सोगावकर यांच्याकडे झालेल्या गैरसोयी बाबतीत दिलगिरी व्यक्त करत येत्या काळात शौचालय नवीन जागी हलविण्यात येऊन प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.