अनुभवातून पुस्तकी ज्ञानापलीकडील माहिती
| पाली/बेणसे | वार्ताहर |
नेणवली शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतेच ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शेतीतील लावणीचे प्रत्यक्ष धडे घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कार्यानुभव शिक्षणाचा एक भाग म्हणून शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचे जवळून ज्ञान मिळाले आहे.
यावेळी, गावातील सक्रिय सदस्य योगिनी मगर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी परी मगर आणि स्वराज मगर यांच्या शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी भात लावणीचे प्रात्यक्षिक केले. चिखलात उतरून, त्यांनी पारंपरिक पद्धतीने भात लावणी कशी केली जाते, याचे सखोल ज्ञान घेतले. शेतीच्या या प्रत्यक्ष अनुभवाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडील माहिती मिळाली.
या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांनी मगर कुटुंबाची मुलाखत घेऊन औत चिखलात फिरवणे प्रत्यक्ष भातशेती लावणे याचे प्रात्यक्षिक गणपत वरगडे सरांनी दाखवले. शेतीमधील बारकावे, आव्हाने आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीबद्दल माहिती जाणून घेतली. त्यातून त्यांना शेतीचे अर्थशास्त्र आणि ग्रामीण जीवनाचे महत्त्व समजण्यास मदत झाली. नेणवली शाळेने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची ओळख करून देण्यासोबतच त्यांना मातीशी जोडण्याचे काम करत आहे.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके, उपशिक्षक गणपत वरगडे व पदवीधर शिक्षक शंकर जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन करून शनिवार आनंददायी केला.
21 व्या शतकात तंत्र ज्ञान युगात विद्यार्थ्यांना कृषी विषयी प्रत्यक्ष माहिती होणे आवश्यक आहे. त्याचे प्रत्यक्ष शिवारफेरीद्वारे मुलांनी अनुभव घेतला.
राजेंद्र अंबिके,
मुख्याध्यापक, नेणवली