| तळा | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीनिमित्त तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजली जावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शाळा ते नगरपंचायत चौकपर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी विठ्ठल रखुमाईची पालखी सजविण्यात आली होती. शिस्तबद्ध पद्धतीने ढोलकीच्या तालावर विठुरायाचे भजन व अभंग गात विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गही तल्लीन होऊन नाचत होते. या दिंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, सहशिक्षक सुनिल बैकर, मित्तल वावेकर, माडी, गुरव, नकम, भोईर, सुभाष मुंढे यांसह मराठी शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.