बेकरे गावात सांडपाणी रस्त्यावर

गावात रोगराई पसरण्याची भीती; स्थानकांमध्ये नाराजी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यतील बेकरे गावात सांडपाणी रस्त्यावर आल्याने बेकरे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  सांडपाणी वाहून जाण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन न केल्याने गावात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मागील वर्षी गावातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यात आला आहे. मात्र हा काही महिन्यात या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि नियोजनशून्य कारभाराचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता तयार करताना सांडपाणी वाहून जाण्यासाठी नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. तर मुख्य रस्ता सोडून आजूबाजूला असणार्‍या घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवली नसल्याने येथील रहिवाशांना उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही चिखलातून वाट काढावी लागत आहे.

याबाबत संबंधित ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी यांना वारंवार विनंती करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तसेच याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करूनही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मी ग्रामपंचायतीचा कर भरला असून मला ग्रामपंचायतीकडून कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नाहीत, माझ्या घरासमोरून सांडपाणी वाहत असल्याने येथे चिखल झाला आहे. ग्रामपंचायतीने या सांडपाण्याबाबत नियोजन करावे.

-जगदीश कराळे, ग्रामस्थ, बेकरे

या संदर्भात बेकरे गावात जाऊन तात्काळ सदर जागेची पाहणी करून साफसफाई केली जाईल.

– संतोष पवार. ग्रामसेवक, माणगाव ग्रामपंचायत.


Exit mobile version