अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले असून, 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले होते. शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायर्‍यांवर आंदोलन केले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सरकारने दिलेले चहापानाचे निमंत्रण विरोधकांनी नाकारून सरकारविरोधात अधिवेशन सुरू होण्याआधीच शड्डू ठोकला होता.

पहिल्याच दिवसापासून विधिमंडळाच्या पायर्या आणि दोन्ही सभागृहांत विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या अधिवेशनात जाणवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात येताच त्यांच्यासमोर विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. शेतकर्‍यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकर्‍यांची वीजबिल माफ करावी, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

Exit mobile version