। मुंबई । प्रतिनिधी ।
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस गदारोळात पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषण,ठाकरे गटाच्या आमदारांना बजावण्यात आलेला व्हीप आदी मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत सरकारने देशद्रोही कोण हे जाहीर करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करीत मुख्यमंत्री एकनाथ यांच्यावर निशाणा साधला.
विकासासाठी सरकार कटिबद्ध -राज्यपाल
शिंदे,फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन.त्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे ते पहिल्या दिवसापासूनच वादळी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्याची झलक सोमवारी प्रारंभालाच आली.सकाळी राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण झाले.त्यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा घेतला.सीमाप्रश्न सोडविण्याबरोबरच शेतकरी,कष्टकरी,गरीबांच्या कल्याणासाठी आपले सरकार प्रामाणिकपणे काम करीत दावा केला.75 हजार बेरोजगारांना नोकर्या देण्याची ग्वाहीही राज्यपालांनी यावेळी दिली.
व्हीपवरुन आरोप
दरम्यान,अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेल्या व्हीपवरुन ठाकरे गटाच्या भास्कर जाधव,सुनील प्रभू यांनी आक्षेप घेतला.जाधव यांनी तर आपल्या आक्रमक शैलीत व्हीपची भीती आम्हाला घालू नका असा इशाराच शिंदे गटाला दिला.तर प्रतोद सुनील यांनीही आम्हाला अजूनपर्यंत कोणताही व्हीप प्राप्त झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयासमोर ते कोणताही व्हीप बजावणार नाही.असे सांगितले आहे. जर त्यांनी असे केल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा प्रभू यांनी दिला आहे.