। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय क्रिकेटचे ‘विनोद’ म्हणजेच विनोद कांबळी सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण डाव खेळत आहेत. कधीकाळी मैदानावर चौकार-षटकार मारणारा हा दिग्गज फलंदाज आज चालणे-फिरणे आणि स्मरणशक्ती गमावणे यांसारख्या गंभीर समस्यांशी झुंजत आहे. वैद्यकीय अहवालानुसार, कांबळींच्या मेंदूत ‘ब्लड क्लॉट’ (रक्ताची गाठ) आहे, ज्यामुळे त्यांना कधीही ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो.
कांबळींचे जवळचे मित्र मार्कस कूटो यांनी सांगितले की, कांबळींची मानसिक स्थिती खूप नाजूक आहे. त्यांची स्मरणशक्ती इतकी कमकुवत झाली आहे की, ते अनेकदा काय करायचे आणि काय नाही हे विसरतात. कांबळीच्या या कठीण प्रसंगात त्याचे बालपणीचे मित्र सचिन तेंडुलकर खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहेत. सचिन पडद्यामागून त्याच्या वैद्यकीय गरजांची सातत्याने काळजी घेत आहेत. याशिवाय, माजी क्रिकेटपटूंनी एक खास व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपद्वारे माजी खेळाडू कांबळीच्या उपचारासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत गोळा करत आहेत. यापूर्वी सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनीही त्याच्या पुनर्वसनासाठी मदतीचा हात पुढे केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळीवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांच्या प्रकृतीत 60% पर्यंत सुधारणाही झाली, ,परंतु, रुग्णालयाचा मोठा खर्च उचलणे कठीण झाले. मित्र आळीपाळीने काही दिवसांचा खर्च उचलत होते, मात्र दीर्घकाळ हे शक्य झाले नाही आणि त्यांना डिस्चार्ज द्यावा लागला. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर काळजी घेतली नाही, तर परिस्थिती जीवघेणी होऊ शकते.
सुमारे 6 महिन्यांपूर्वीपर्यंत कांबळी घरात फर्निचर पकडून चालत होते, पण आता ते ‘हायकिंग स्टिक’ (काठी) च्या आधाराने स्वतः चालू लागले आहेत. अलीकडेच त्यांनी दशकांनंतर एका आईस्क्रीम ब्रँडसाठी जाहिरातीचे शूटिंगही केले आहे. सध्या ते आपला बहुतेक वेळ मुलांसोबत घालवत आहेत.







