पुन्हा एकदा लॉगहेड समुद्री कासव मृतावस्थेत

| मुरूड | वार्ताहर |
मुरूड समुद्रकिनारी दहा दिवसांत दुसरे लॉगहेड प्रजातीतील कासव मृतावस्थेत सापडले आहे. दोन महिन्यांत एकूण चार लॉगहेड जातीचे कासव मृतावस्थेत सापडले आहे. हे कासव दहा ते बारा दिवसांपूर्वीच मृत झाले असावे, याचे वजन 30 किलो आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सतत मृतावस्थेत सापडणार्‍या कासवांमुळे प्राणीमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बाणकोट वेळास, मंडणगड तालुका, जिल्हा रत्नागिरी येथे कासव संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जातात. या ठिकाणी दरवर्षी कासव महोत्सव भरवला जातो. या कासव महोत्सवाला प्राणीमित्र व पर्यटक आवर्जून भेट देत असतात. बाणकोट वेळास समुद्र व मुरुड समुद्र हे अगदी नजीकच आहे. बाणकोट वेळास येथे मोठ्या प्रमाणात कासवांचे संवर्धन केले जाते व मुरुडला मोठ्या प्रमाणात कासव मृतावस्थेत सापडत आहेत, हे मुरुडचे दुर्भाग्य आहे.
बाणकोट वेळास प्रमाणे मुरुडला ही कासवांचे संवर्धन व्हावे अशी मागणी प्राणी मित्र व पर्यटकांना मधून मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी शासनाने पर्यटन वाढीसाठी कासवांचे संवर्धन करणे गरजेचे आहे जेणेकरून मुरुडच्या पर्यटनवाढीला हातभार लागेल.

Exit mobile version