| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
कोल्हापूर ते मिरज मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द केल्या. तसेच तीन रेल्वे गाड्यांचा प्रवास तब्बल एक ते दोन तास उशीर सुरू झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळी साडेनऊच्या सुमारास सुटलेली पॅसेंजर रेल्वे गांधीनगर ते रुकडी मार्गावर बंद पडली. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. यानंतर सायंकाळी साडेचार जाणारी कोल्हापूर ते सातारा पॅसेंजर गाडीही कोल्हापुरातून सुटण्यास विलंब झाला. याच गाड्या कोल्हापूरपुढे गेल्या नसल्याने परतीच्या दोन फेऱ्या रद्द झाल्या. पॅसेंजर गाड्यांना कोल्हापूर, कराड, सांगली, मिरज मार्गावर नोकरी व्यवसायानिमित्त कोल्हापुरमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली. जवळपास साडेतीनशेवर प्रवाशांचा आज खोळंबा झाला. एवढे होऊनही रेल्वे किती विलंबाने येणार किंवा किती विलंबाने सुटणार याचे ठोस उत्तर रेल्वे प्रशासनाकडून मिळत नव्हते. परिणामी, अनेक प्रवाशांनी रेल्वेचा प्रवास रद्द करून खासगी वाहनाने पुढील प्रवासाला निघणे पसंत केले.