एकांकिका स्पर्धा कलाकाराच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा

अभिनेते ओमकार भोजने यांचे प्रतिपादन

पनवेल | साहिल रेळेकर |
एकांकिका स्पर्धा कलाकाराच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. माझ्या आयुष्यात एकांकिका स्पर्धांना फार मोलाचे महत्व आहे. युवा महोत्सवासारख्या विविध आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून कलेला वाव देणारे उत्तम व्यासपीठ मिळाले,असे प्रतिपादन अभिनेता ओमकार भोजने यानी केले.
पनवेल येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान एकांकिकेविषयी आपले प्रेम व्यक्त करताना बोलत होता. ओमकार पुढे म्हणाला की, मला कोणताही अभिनय क्षेत्राशी निगडित बॅकग्राऊंड नाही. त्यामुळे मी अभिनय करू शकतो हा विश्‍वास मला या एकांकिका स्पर्धांनी दिला. त्यात मी कोकणातला असल्यामुळे चळवळ आणि एकांकिका करत असल्यामुळे वळवळ या दोन्हीही गोष्टी मला जवळच्या आहेत. ज्यावेळी मला एखाद्या एकांकिका स्पर्धेचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून बोलावण्यात आले त्यावेळी मनात विचार आला की, एकांकिका विश्‍वात या गोष्टीची खरंच गरज आहे का? पण हा ब्रँड अम्बॅसेडर कोणत्याही गोष्टी मिरवत नाही, तर या गोष्टीची खात्री देतो की, काल मी अशाच स्पर्धा करून पुढे आलोय. आणि अशा स्पर्धांमुळे फक्त प्रोत्साहनच नाही तर जीवनाला एक दिशा देखील मिळते. तेच सांगायला काल परवा मी स्टेजवर उभा होतो, आणि आज बॅनरवर आलोय एवढाच फरक आहे.

Exit mobile version