। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यातील आरोग्यभरती प्रकरणी एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा संशयित 28 वर्षांचा असून त्याला औरंगाबाद येतून ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या वतीने 24 ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यात शेकडो विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं. त्यानुसार 28 नोव्हेंबरला ही फेरपरीक्षा पार पडली. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं.
यानंतर सार्वजनिक आरोग्य खात्यातील गट ड संवर्गातील परीक्षा राज्यभरात झाली. यामध्ये पेपर फुटीची प्रकरणं समोर आल्याचं दिसलं. अनेक उमेदवारांकडे परीक्षा केंद्रावरील पेपर हाती येण्याच्या आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर आल्या होत्या. संबंधित प्रकरणात पुण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आणि पोलिसांनी तपासाला गती दिली.
पुणे जिल्ह्यातील 51 टक्के उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य खात्याच्या गट डची परीक्षा दिली. पुण्यातील परीक्षा केंद्रावर कोणताही गोंधळ झाला नसून, सर्व केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती खात्यातील अधिकार्यांनी दिली आहे.