व्यावसायिकांच्या छळवणुकीमुळे एकाची आत्महत्या

। पनवेल । वार्ताहर ।
बांधकाम साहित्याचा पुरवठा करणार्‍या दीपक काटबू (40) याने मुंब्रा येथील दोघा बांधकाम व्यावसायिकांच्या छळवणुकीमुळे पनवेलमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. काटबू याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरून काढलेल्या व्हिडीओवरून हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अब्दुल मुकीम अब्दुल रहमान अन्सारी व वसीम या दोन बांधकाम व्यावसायिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

दीपक काटबु हा दहीसर मोरी परिसरात राहत होता. त्याचा बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. शिळफाटा येथील मुनीर कंपाऊंडमध्ये अब्दुल मुकीम अब्दुल रहमान अन्सारी आणि वसीम या दोघांनी गेल्या काही महिन्यापासून बेकायदा बांधकामाला सुरुवात केली होती. याच साईटवर दीपक हा काही महिन्यांपासून बांधकाम साहित्याचा पुरवठा करत होता. त्यांच्याकडून दीपकला 17 लाखांपेक्षा जास्त रक्कम येणे बाकी होते. त्यामुळे दीपक त्यांना वारंवार संपर्क करत होता. मात्र बबलू आणि वसीम या दोघांनी त्याचे फोन घेणे बंद केले होते.

देणेकरी दीपककडे पैसे मागत असल्याने मागील काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली आला. त्यामुळे अस्वस्थ झालेला दीपकने हॉटेलच्या रुमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. पनवेल शहर पोलिसांनी त्यावेळी आकस्मात मृत्यूची नोंद करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Exit mobile version