महाडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा करणार्‍या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महाड शहरा मध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाड नगर पालिकेने धरणातील पाणी नियंत्रणासाठी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे, यामुळे इमारतीमधील रहिवाश्यांना खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागणार आहे.

शहरातील बहुतांशी भागाला कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो धरणातून थेट जलवाहिनीद्वारे हा पाणीपुरवठा होतो, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर शहरातील पाणीटंचाई अवलंबून असते. यावर्षी कोतुर्डे धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. शहराला प्रामुख्याने कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय कुर्ले धरण व एमआयडीसी, लाडवली जॅकवेल येथूनही काही प्रमाणात शहरातील पुर्वेकडील व उत्तरेकडील भागात पाणापुरवठा होतो. या चारही ठिकाणाहून दररोज 40 लाख लिटर्स पाणी नगरपालिका शहराला पुरविते. कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी छ.शिवाजी चौकातील मोठ्या टाकीत आणण्यात आले आहे. तेथून बहुतांशी भागाला पाणीपुरवठा होतो. कोतुर्डे धरणातील पाण्यावर महाड प्रमाणे अन्य गावेही अवलंबून आहेत.

यंदा पाऊस मुबलक पडूनही धरणांतील पाणी मात्र कमी होऊ लागल्यानंतर 5 मे पासून धरणातील मृत पाणीसाठ्याला पंप लावून उपसा करून यातील पाणी नगरपालिका शहरात पुरवत आहे. यावर्षी पाणीसाठा लक्षात घेता पाऊस सुरु हाईपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा यासाठी पालिकेने पाणीकपात केली आहे .त्यामुळे आता शहरात एक दिवसाआड पाणी येत आहे. या पाण्याने पिण्याची गरज भागत असली तरी वापरालाही मोठ्या प्रमाणाच पाणी लागत असल्याने काही नागरिक शहरातील विंधनविहिरीचा वापर करत आहेत. मोठ्या इमारतीमध्ये पाण्याचा टँकर विकत मागवावा लागत असल्याचे दीपक पाटील या रहिवासीनी सांगितले. महाड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे,रहिवासी इमारती व व्यापारी पाणी वापर वाढत आहे.त्या तुलनेत पाण्याची गरज भागत नसल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पूरामुळे तर उन्हाळ्यात टंचाईमुळे महाडकरांना पाणीपाणी करावे लागत आहे

धरणातील पाणी कमी होत आहे.नागरिकांना हे पाणी पुरावे यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

– रोहित भोईर ( अभियंता )
Exit mobile version