धरणातील गाळमुळे साठवण क्षमता कमी, मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
गेली 50 वर्षे पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने उरण शहर व तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. दरवर्षी नागिरकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी तर जानेवारीपासूनच पाणीकपातीचे संकट उरणकरांवर आले आहे. पुढील आठवडाभरापासून आठवड्यातून दोन दिवस पाणी येणार नाही. मंगळवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. उरण शहरात गेली काही वर्षे सातत्याने शहरीकरण व औद्योगिकीकरण वाढत आहे. अनेक मोठे प्रकल्प शहरालगत येत असल्याने नवी मुंबईचे उपनगर म्हणून उरणकडे पाहिले जात आहे. मात्र या तुलनेत येथील मूलभूत समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
पाणीटंचाई ही उरणची एक मोठी समस्या असून ती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील 25 ग्रामपंचायती, उरण नगरपालिका, तसेच येथील ओएनजीसी व वायू विद्युत केंद्र या प्रकल्पांना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणात गाळ साचल्याने पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. त्यात लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वर्षभर पुरावा यासाठी जानेवारीपासूनच पाणीकपात करावी लागत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून गुरुत्व जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम एमआयडीसीकडून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजेपासून पुढील 24 तास जिल्ह्यातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोलशेत, वागळे इस्टेट, कळवा येथील काही भाग, दिवा शहर, मुंब्रा येथील अग्निशमन दल केंद्र ते अल्साम कॉलनी भाग तसेच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, तळोजा, ग्रामपंचायती, 27 गाव हद्दीतील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
उसने पाणी
वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीला सिडकोकडून उसने पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
- एमआयडीसीकडून नगरपालिकेला पाणीपुरवठा केला जात असून त्यांच्याकडूनच पत्र आले आहे. त्यानुसार मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या संदर्भात शहरातील नागरिकांना सूचना देण्यात आली आहे. – झुंबर माने, अभियंता, उरण नगरपालिका