| अकोला | वार्ताहर |
तीन कुटुंबांमधील जमिनीचा वाद टोकाला गेल्याने एकाची मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच काठी आणि कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना अकोल्यामध्ये घडली आहे. दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील आहे. आखरे, पुंडे आणि कुटे अशा तीन कुटुंबात सरकारी जागेवरुन वाद सुरू होते. काल आखरे कुटुंबातील एकाने या वादग्रस्त जागेवर खत आणून टाकले होते तर त्याच खतावर दुसऱ्या एका कुटुंबाने जनावरे आणून बांधली होती. यावरुनच रात्री उशिरापर्यंत तिन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. अशातच नितीन सुधाकर आखरे (३३) हे घराच्या अंगणात झाेपले होते. याचवेळी काही अज्ञात लोकांनी येऊन त्यांच्यावर लाठीकाठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात नितीन आखरे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बाळापूर पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या वादादरम्यान आखरे यांना संपवण्याची धमकी इतर कुटुंबियांनी दिली होती. याच वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू
