दुचाकीच्या अपघातात एक ठार

| पनवेल | वार्ताहर |

कळंबोली सर्कलयेथून पनवेल येथे जाणार्‍या तरुणांची भरधाव स्कुटी खांदा कॉलनी येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात स्कुटीचालक तरुणाचा मृत्यू तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना खांदा कॉलनी येथे घडली. या अपघाताला मृत स्कुटीचालक जबाबदार असल्याचे आढळून आल्याने खांदेश्‍वर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण पळसमकर (27) असे असून जखमी झालेल्या त्याच्या सहकार्‍याचे नाव अविनाश जोगळे (29) असे आहे. प्रवीण व अविनाश हे दोघेही नातेवाईक असून ते कळंबोली सर्कल येथून स्कुटीवरून पनवेल येथे जात होते. यावेळी प्रवीणला खांदा कॉलनी येथील ब्रिजवर चढताना अंधारामुळे पुलाचा कठडा निदर्शनास न आल्याने तो भरधाव वेगामध्ये कठड्यावर स्कुटीसह धडकला. त्यामुळे प्रवीण व त्याचा सहकारी अविनाश हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रवीणचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version